कोरोनामुळे मृत पत्नीचं पार्थिव रुग्णालयातून पळवल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा, तर महिलेच्या भावाची रुग्णालयाविरोधात फेसबुक पोस्ट

Share Now To Friends!!

बीड : कोरोनामुळे मृत झालेल्या पत्नीचा मृतदेह रुग्णालयातून परस्पर पळवल्याच्या आरोपाखाली पतीविरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. मात्र मृत महिलेच्या भावाने रुग्णालय प्रशासनाचे आरोप चुकीचे असल्याचं सांगत अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आल्याने मृतदेह घरी नेल्याचा सांगितलं आहे. इतकंच नाही तर घरी अंत्यसंस्कार न करता मृतदेह पुन्हा रुग्णालयाच्या स्वाधीन करुन अंत्यसंस्कार केल्याचा दावाही केला आहे.

बीडच्या जिल्हा रुग्णालयात गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी इथल्या सुरवसे नामक एका महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह परस्पर घरी नेल्याचा आरोप करत रुग्णालयातील परिचारिका अर्चना पिंगळे यांच्या तक्रारीवरुन बीड शहर पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिलेचा सोमवारी (17 मे) पहाटे पाच वाजता मृत्यू  झाला. त्यानंतर डॉक्टर आणि नर्स यांची नजर चुकवून पती रुस्तुम सुरवसे यांच्यासह नातेवाईकांनी मृत महिलेचा मृतदेह  गाडीत टाकून पळवून नेला, अशी तक्रार नर्स अर्चना रामेश्वर पिंगळे यांनी दिली. या तक्रारीवरुन बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. इथून पुढे कुठल्याही नातेवाईकांना मृतदेह परस्पर घेऊन जाता येऊ नये यासाठी सुरक्षा वाढवण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाला पत्र दिलं आहे, असं अतिरिक्त शल्यचिकित्सक सुखदेव राठोड यांनी सांगितलं.

दरम्यान या सगळ्या प्रकारावर मृत महिलेच्या भावाने फेसबुकवर पोस्ट लिहून सबंध प्रकार कथन केला आहे. सुभाष कबाडे यांनी लिहिलं आहे की….

माझी बहिण लता सुरवसे गेली… 27 दिवस बीडच्या सिव्हिलमध्ये जगण्यासाठी लढत होती. अगोदर वॉर्ड नं. 3 नंतर वॉर्ड नं. 5 मध्ये… मी पूर्णवेळ सिव्हिलमध्ये असायचो. यावेळी जिओ जिंदगीचा सदस्य म्हणून गावाकडील रुग्ण व नातेवाईकांना मदत करायचो, माझी बहिण नीट होऊ लागली तिचा ऑक्सिजन देखील 94 पेक्षा अधिक येऊ लागला. मात्र ऑक्सिजन काढले की कमी येऊ लागले… मला गावाकडे घेऊन चल म्हणून तिने कितीतरी वेळा विनवणी केली, तिचं चार वर्षाचे बाळ तिला पहायचे होते. मात्र घेऊन जाऊ शकत नव्हतो, बहिणीची काळजी करताना जिओच्या कामात स्वतःला झोकून दिले. काल मात्र ऑक्सिजन 75 वर आला अन् मी घाबरलो, डॉ धूत यांना बोललो फिजिशियन दुर्गुडे साहेब यांना बोललो, मी त्यांना घेऊन रात्री ताई जवळ नेले. त्यांनी सांगितले फुफ्फुस जड पडले, अडचण आहे. त्यांनी बायपॅप मागवला मात्र लवकर मिळाला नाही. मग मुन्ना जगताप या कॉलमन यांना विनंती करुन मदर वॉर्डमध्ये धावत जाऊन बायपॅप लावला. ती सारखं खुणवायची हे काढ हे काढ… मात्र कसे काढणार… मग दुर्गुडे यांनी एक इंजेक्शन आणायचे सांगितले. बाहेरुन एक आज, एक उद्या… मग धावत बाहेर मेडिकलवरुन इंजेक्शन आणले. मात्र तोवर दुर्गुडे दुसरीकडे गेले अन् सिस्टरकडे इंजेक्शन दिले पण त्या पेशंटला इंजेक्शन लवकर देईनात. आम्ही डोळ्यात त्राण आणत वाट पाहू  लागलो. सिस्टर लक्ष देईनात म्हणून माझे मित्र म्हटले हे बरोबर नाही… पेशंट सिरीयस आहे. तर त्या म्हटल्या इथे इतरही सिरीयस आहेत… आमचे 25 मिनिट त्यात गेले. तिथे असणारे एक पुरुष तर म्हटले यांना आत कुणी येऊ दिले? सेक्युरिटीला बोलवा, कुणाला हौस आहे साहेब इथे येण्याची माझी बहिण मरणाशी लढते आहे. आम्ही आणलेले इंजेक्शन तुम्ही देईनात… आम्ही नसल्यावर काय कराल? दुःखाची माय यडी असते. मी रुमवर गेलो मात्र मन लागेना परत हॉस्पिटलमध्ये आलो, बहीण माझी धापा टाकत होती काय करावं सुचत नव्हतं, 28 दिवसाचा संघर्ष आणि 4 वर्षांचा भाचा माझ्या डोळ्यासमोर होता. बहीण काकूळतीला आली… म्हटली मेल्यावर गावाकडे ने… काय वाटले असेल मला भाऊ म्हणून..? अहो केवळ 32 वय 28 दिवस लढा.. माझे मित्र म्हटले कबाडे काही नाही होणार. मात्र मला कळून चुकले होते, कुणी लक्ष द्यायला नव्हते आणि माझी बहिण गेली… एक उचकी अन् ती शांत… गुरा-ढोरा सारखा मी व्हरांड्यात एकटाच मोठ्याने रडत होतो. मला आठवले बहिण म्हटली गावाकडे ने. मग सिव्हिलने अँटीजन टेस्ट केली एक नाही दोन वेळा, ती निगेटिव्ह आली. मला वाटले बहिणीची शेवटची इच्छा तरी पुरी होईल. कारण पॉझिटिव्ह बॉडी देत नाहीत हे मला माहित होते, आम्ही म्हटले निगेटिव्ह आहे आम्हाला परवानगी द्या… कारण तसा नियम आहे… 2 तास हो-नाही मध्ये वेळ गेला. मात्र तेवढ्यात एक अधिकारी पीपीई किटमध्ये आले. ते म्हणाले, नेता येते मात्र सीएस गितेंना बोला… सीएसला फोन केला मात्र ते फोन उचलत नव्हते. मग मी व इतर गावाकडील चार जणांनी बहीण उचलली आणि गावाकडे घेऊन निघालो. सर्वांसमक्ष… कारण मला वाटले काही अडचण नाही निगेटिव्ह आहे. मात्र गावाकडे गेलो तोच मित्राचा फोन आला की बीडला परत यावं लागेल… मला काही कळेना मात्र नंतर डॉ. राठोड उपजिल्हा शल्य चिकित्सक यांनी निरोप दिला. यंत्रणेकडून थोडी चूक आहे… परत या… इकडे करावे लागेल… सगळं सरण रचलेलं… कुटुंबातील मोजकीच माणसं जमलेली… पण त्याही परिस्थितीत मी परत फिरलो. बॉडी सिव्हिलमध्ये परत आणली. प्रशासनाच्या स्वाधीन केली आणि भगवान बाबा प्रतिष्ठानमध्ये तिला निरोप दिला… माझं घर रडून कोलमडून गेले… माझ्या बहिणीच्या मृत्यूला आणि मृत्यूनंतर मृतदेहाची जी विटंबना झाली त्याला सिव्हिलच्या प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे… मात्र माणूस गेलं आपलं… बोलता कुणाला? म्हणून मी गप्प… बहिणीचा अग्नी शांत होत नाही तर पोलिसांची गाडी स्मशानाच्या दारात… मित्राने त्यांना सांगितले यंत्रणेच्या विनंतीला मान देऊन शव परत आले आहे. आता कशाला त्रास… पोटात अन्नाचा कण नाही… माझं पूर्ण कुटुंब कोलमडले असताना मला प्रशासनाकडून आधार नाही तर गुन्हा दाखल करत असल्याचे समजले… वा रे वा माझी बहिण गेली अन् यांना माझ्यावर गुन्हा दाखल करायचा आहे. पोलीस बंधूंना माझी विनंती राहील माझ्या बहिणीच्या मृत्यूची चौकशी करा, कुठले डोस दिले? कधी दिले? आमच्या माणसाच्या मढ्यावर तरी आमचे अधिकार ठेवा. संवेदना जिवंत ठेवा! सिव्हिलमधील कारभार 28 दिवसापासून पाहतोय… माझ्या बहिणीचे अंत्यसंस्कार इथेच व्हावे यासाठी सगळा दवाखाना जसा कामाला लागला तसे तिला वाचवण्यासाठी कामाला लागला असता तर आज चार वर्षाच्या लेकराची माय जिवंत असती! नका घेऊ तळतळाट..

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment