कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे खरे पाप कोणाचे, याचं आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावं : अशोक चव्हाण

Share Now To Friends!!

मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. यावरुन आता काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप शासित राज्यात परिस्थिती दयनीय झाली असताना फडणवीस मात्र महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचे काम करत असल्याची गंभीर टीका चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

अशोक चव्हाण यांचे ट्विट काय आहे?

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य असल्याने आपण अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे, यात दुमत नाही. पण महाराष्ट्रावर प्रेम करणारा एक सच्चा मराठी नागरिक म्हणून मला किमान हे समाधान आहे की, माझ्या राज्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृतकांच्या संख्येबाबत लपवाछपवी केली नाही. शासकीय नोंदीमध्ये मृतकांची संख्या बोटावर मोजण्याइतपत ठेवून स्मशानात रात्रंदिवस जळणाऱ्या डझनोगणती चिता लपवण्यासाठी पत्रे ठोकण्याचे पाप महाराष्ट्राने केले नाही. 

अंत्यसंस्कारासाठी मोठी रांग आहे, लाकडे नाही, जागा नाही म्हणून शेकडो मृतदेह नदीत बेवारस सोडून देण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी किंवा ऑक्सिजन, लसींच्या तुटवड्यावर बोलाल तर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्याची, संपत्ती जप्त करण्याची धमकी महाराष्ट्राने नागरिकांना दिली नाही. हे सारे प्रकार ज्या राज्यात घडले, तिथे भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही फडणवीस यांनी एखादे खरमरीत पत्र लिहिले तर त्यातून तिथल्या राज्य सरकारांच्या कामात सुधारणा होईल आणि कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल, अशी मला अपेक्षा आहे.

देशाच्या कोरोना परिस्थिताला जणू महाराष्ट्रच जबाबदार आहे, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रातून जाणवते. भाजपवरील महाराष्ट्रद्रोही हा ठपका ते या पत्रातून खरा ठरवत आहेत. त्यांना माझी विनंती आहे की, आपल्या राज्याबद्दल चुकीची प्रतीमा निर्माण करू नका. भारतात कोरोना कसा वाढला, ते अख्ख्या देशाला आणि आता संपूर्ण जगाला कळून चुकले आहे. खा. राहुलजी गांधी यांनी गेल्या वर्षी वेळीच इशारा दिला होता. पण भाजपने त्यांची थट्टा केली. ‘नमस्ते ट्रंप’ केला. मध्य प्रदेशातील सरकार पाडलं. यंदा पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने लाखो लोक गोळा केले. कुंभमेळ्याबाबत निष्काळजीपणा केला. कोरोनाऐवजी निवडणुकीला प्रथम प्राधान्य दिले. त्यामुळे देशातील कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे खरे पाप कोणाचे, याचे आत्मपरीक्षण फडणवीस यांनी केले पाहिजे, अशी गंभीर टीका चव्हाण यांनी केली आहे.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment