मुंबईच्या टोल नाक्यावरील पिवळी पट्टी गायब, टोलच्या नियमांची पायमल्ली; कोल्हापुरात मात्र वेगळं चित्र

Share Now To Friends!!

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या टोल नाक्यांवर शंभर मीटरच्या पिवळ्या पट्टीचा नियम लागू केला आहे. फास्ट टॅग सिस्टम आणून देखील टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागत असतील तर शंभर मीटर वर एक पिवळी पट्टी आखून त्या पट्टी पर्यंत रांग गेल्यास सर्वांना टोल न घेता सोडावे असा हा नियम आहे. 

मात्र महाराष्ट्रात राज्य सरकारच्या एम एस आर डी सी आणि पीडब्ल्यूडीच्या असलेल्या टोलनाक्यांवर आधीपासूनच हा नियम लागू आहे. त्याचे पालन मात्र कोणी करत नाही. मुंबईच्या प्रवेशद्वारांवर वाशी, ऐरोली, दहिसर, मुलुंड, आनंदनगर आणि मुलुंड एलबीएस रोड या ठिकाणी एम एस आर डी सी चे टोल नाके आहेत. तिथे देखील या शंभर मीटरच्या नियमाचे पालन केले जात नाही. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही मुंबईच्या आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या महत्त्वाच्या आनंद नगर टोल नाका येथे जाऊन पडताळणी केली असता तिथे पिवळ्या रंगाची पट्टीच नसल्याचे दिसून आले. तसेच टोलनाक्यापासून 100 मीटर पेक्षा पुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या मात्र सर्वांकडून टोल वसूल केला जात होता. या नियमाला बगल देता यावी यासाठी टोल घेणाऱ्या कंपनीने टोल नाके पुढे-मागे केलेले आहेत. त्यामुळे मुख्य टोलनाक्यापासून शंभर मीटर अंतर कुठे मोजावे हेच लक्षात येत नाही.

टोल नाक्यावर गाडी 10 सेकंदांपेक्षा जास्त थांबू नये यासाठी NHAI च्या गाईडलाईन्स जारी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लागू केलेल्या पिवळ्या पट्टीच्या नियमाचे आम्हीदेखील काटेकोरपणे अंमलबजावणी करू असे एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मात्र हा नियम आधी पासूनच लागू असल्याचे लक्षात आणून दिल्यावर, जर या नियमाचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाईचे आदेश देऊ असे त्यांनी सांगितले. 

कोल्हापूरात चित्र वेगळं

कोल्हापूरात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. जिथं वाहनांची ही रांग शंभर मीटरच्या आत येत नाही तोपर्यंत टोल घेता येणार नाही, असा नियम आहे. फास्टटॅग प्रणाली बंधनकारक केल्यानंतर देखील तांत्रिक कारणांमुळे अनेक टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे येत होत्या. त्यामुळे आता केवळ दहा सेकंदांमध्ये टोलनाक्यावरून गाडी पास होईल अशी व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. त्याच अनुषंगाने ही नवीन मार्गदर्शक तत्वे मांडली आहेत.

…तर टोल नाक्यांना पेनल्टी बसणार का ? 

टोलनाक्यावर 100 मीटर पेक्षा जास्त रांगा असल्या तरी वाहन टोल न फाडता सोडून देण्यात येतील असा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे, या निर्णयाचे वाहनचकांनी स्वागत केलं असलं तरी  गर्दीच्या वेळी 10 सेकंदात वाहन पास होईल हे कसे मोजणार, जर 10 सेकंद पेक्षा जास्त वेळ लागला तर टोल नाक्याला पेनल्टी बसणार का असा सवाल वाहनचक उपस्थित करत आहेत. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment