रावसाहेब दानवे चांगले मित्र, कधी-कधी विनोद करतात : संजय राऊत

Share Now To Friends!!

मुंबई : “दोन वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं आणि शिवसेनेला सत्ता मिळाली, तसेच भाजपच्या सत्तेला टाळं लागलं,” असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत आज (16 जून) मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलताना रावसाहेब दानवे यांनी काल (15 जून) संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. “संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, त्यांना कुणीतरी चावी देतं आणि मग ते केंद्र सरकार विरोधात टीका करतात,” अशा शब्दात दानवेंनी राऊतांना चिमटा काढला होता. त्यानंतर आज राऊतांनी दानवे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “रावसाहेब दानवे हे आमचे चांगले मित्र आहेत, कधी कधी ते विनोद करतात. त्या विनोदी शैलीचे मी कौतुक करतो,” असं सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीत.

अजित पवार, नाना पटोले यांना येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी : रावसाहेब दानवे

संजय राऊत यांचा बोलविता धनी वेगळाच : रावसाहेब दानवे
गेल्या काही दिवसापासून संजय राऊत सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. परंतु त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, असं म्हणत दानवेंनी संजय राऊतांवर निशाना साधला. संजय राऊत यांना चावी दिली की ते बोलतात पण आता लोक संजय राऊतांना गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकार तोडगा काढेल : संजय राऊत
मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात येत आहे. याबद्दल संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले की, “कोल्हापुरातील आंदोलनात सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत. त्यात छत्रपती संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे स्थानिक खासदार धैर्यशील माने आणि काँग्रेसचे काही नेते ही सहभागी झाले आहे. कोल्हापुरातील आंदोलन नसून मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत. आरक्षणाचा प्रश्‍न सोडवावा यासाठी केंद्राकडे या नेत्यांनी साकडं घातलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच या प्रश्नावर तोडगा काढेल.”

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment