Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Share Now To Friends!!

राज्यात सोमवारी 42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज, तर 22,122 नवीन रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात सोमवारी (24 मे) 42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 22,122 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल 361 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. राज्यात सध्या एकूण 3,24,580  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 51,82,592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.51 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,32,77,290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,02,19 (16.83 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 27,29,301 व्यक्ती होम क्वॉरन्टीन असून 24,932 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरन्टीन आहेत. 

स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर येऊन लस घेता येणार; मुंबई महापालिकेकडून गाईडलाइन्स जारी
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिनांक 19 मे 2021 रोजी निर्गमित केलेल्या सुचनांनुसार, स्तनदा मातांनाही कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर थेट येऊन नोंदणी करणाऱ्या (वॉक इन) स्तनदा मातांना कोविड लस देण्यात येणार आहे. स्तनदा मातांना लस देताना योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसुती झाल्याची दिनांक, स्थळ यांसह आवश्यक वैद्यकीय कागदपत्रं तसेच वैद्यकीय माहिती महिलांनी समवेत बाळगणे आवश्यक आहे. आठवड्याचे पहिले तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱ्या विविध पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येते. त्यामध्ये आता स्तनदा मातांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱ्या (वॉक इन) स्तनदा मातांचे लसीकरण केंद्रामध्ये जागेवरच नोंदणी करुन लागलीच त्यांना लस देण्यात येईल.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढवण्यासाठी लगतच्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करा; मुख्यमंत्र्यांचा आदेश
मागील काही दिवसांमध्ये वन्य प्राणी आणि मानवामधील संघर्षाच्या घटना वाढल्याचं दिसून आलं होतं. मानवी वस्त्यांमध्ये नव्य प्राण्यांचा वावरही चिंतेत टाकणारी बाब. याच मुद्द्यावर आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष टाकलं आहे. सध्या महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून आताच्या घडीला राज्यात  312 वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे. त्यातच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने लगतच्या दोन गावांचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत वनविभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. 

‘माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो’ : खासदार संभाजीराजे छत्रपती 
माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो, अशी  उद्विग्न प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी राज्य दौरा सुरु केला असून आज ते सोलापुरात होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की,  28 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहोत. हा दौरा कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ओबीसी समाजाचे ज्येष्ठ लोक भेटले त्यांनी मला चांगला मार्ग सांगितला. मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी दौरा करतोय.  लोकांना काय वाटतेय यापेक्षा कायदा काय आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठीच मी हा दौरा सुरु केलाय, असं ते म्हणाले. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment