Corona Vaccine : Pfizer ची लस 12 वर्षांपुढील सर्वांसाठी उपयुक्त, कंपनीची केंद्र सरकारला माहिती

Share Now To Friends!!

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. मात्र कोरोनाशी सामना करण्यासाठी महत्त्वाची असलेल्या कोरोनाचा लसींचा तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकन कंपनी फायझरने (Pfizer) आपल्या कोरोना लसीच्या परिणामकारकतेची, चाचणीची संपूर्ण माहिती भारताला दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि इतर देशांनीही या लसीला दिलेल्या मंजुरीबाबत संपूर्ण माहिती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फायझरने सरकारला सांगितले की, त्यांची कोरोना लस ही 12 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांसाठी उपयुक्त आहे. या लसीला एका महिन्यासाठी 2 ते 8 डिग्री तापमानात ठेवता येऊ शकते. तसेच कंपनीने केंद्र सरकारला सांगितले की, ही कोरोना लस भारतात आढळणार्‍या कोरोना व्हायरससाठी बरीच प्रभावी आहे.

यापूर्वी सोमवारी सूत्रांनी सांगितले होते की, फायझर या वर्षाच्या अखेरीस पाच कोटी लस देण्यास तयार आहे. परंतु त्यांना भरपाईसह काही नियामक अटींमध्ये मोठी सूट हवी आहे. कंपनीने म्हटले आहे की, लस पुरवठ्याबाबत फक्त भारत सरकारशीच चर्चा केली जाईल आणि या लसींची किंमत भारत सरकारने फिझर इंडियाला द्यावी लागेल. फायझरने अमेरिकेसह 116 देशांशी करार केला आहे. आतापर्यंत जगभरात फाइझर लसींचे 14.7 कोटी डोस देण्यात आले आहेत.

सध्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस नागरिकांना दिली जात आहे. सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीलाही मान्यता दिली आहे, मात्र अद्याप ही लस सर्वसामान्यांनी दिली जात नाहीये. देशात कोरोना लसींचे 20 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

कोविड -19 लसीकरण मोहिमेत आज भारताने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आज सकाळी 7 वाजता प्राप्त आकडेवारीनुसार मोहिमेच्या  130 व्या दिवशी भारतातील कोविड लसीकरणाने 20 कोटींचा टप्पा (एकूण 20,06,62,456 मात्रांपैकी 15,71,49,593 पहिली मात्रा तर 4,35,12,863 दुसरी मात्रा ) पार केला आहे.  भारतातील  कोविड -19 लसीकरण मोहीम जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम असून तिची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते 16 जानेवारी  2021ला झाली आहे. केवळ 130 दिवसात हा टप्पा गाठणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे. अमेरिकेने 124 दिवसात  20 कोटींचा टप्पा पार केला होता. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment