Cyclone Tauktae : …अन्यथा सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करु; मुंबई महापालिकेला भाजपचं अल्टिमेटम

Share Now To Friends!!

Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहरात 2 हजार 364 वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. वादळानंतर 48 तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता, हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून वृक्ष छाटणीकरिता कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समिती समोर 18 मार्च 2021 पासून आजतागायत प्रलंबित असून याला जबाबदार कोण? असा सवाल करत येत्या आठवडाभरात वृक्ष प्राधिकरणामध्ये वृक्ष छाटणीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन प्रत्यक्ष वृक्ष छाटणीस प्रारंभ केला नाही, तर मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल, असा गंभीर इशारा भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत दिला आहे.

तोक्ते चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचा केवळ देखावा करण्यात आला. तोक्ते नैसर्गिक आपत्तीत पालिका प्रशासनाच्या मनुष्यबळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. वादळानंतर 48 तासांचा कालावधी लोटूनही रस्त्यावर पडलेल्या मोठ्या वृक्षांच्या फांद्या बाजूला करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, मोठी झाडे कापण्यासाठी साधनसामुग्री, विद्युत करवती उपलब्धच नाहीत. रस्त्यावरिल पालापाचोळा उचलण्यासाठी यंत्रणाच तोकडी पडल्याचे चित्र आहे. वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता तर मार्च-एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणी झाली असती. त्यामुळे भार हलका झाल्याने कितीतरी झाडे कोसळलीच नसती. वृक्ष प्राधिकरण समितीच्या या अक्षम्य विलंबामुळे मुंबई शहर हजारो मोठ्या आणि प्राचीन वृक्षांना मुकले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी गाड्यांची नासधूस झाली आहे. पालिकेच्या या बेजबाबदार वर्तनाचा तीव्र निषेध भाजपच्या सदस्यांनी स्थायी समितीत केला.

वृक्ष छाटणी आणि फांद्या हटवण्याचे काम सुरुच : यशवंत जाधव

वृक्ष छाटणी आणि छाटणीनंतर फांद्या हटवण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु वृक्ष प्राधिकरणाची बैठक झाली नाही हे खरे असले तरी जुन्या कंत्राटदाराच्या माध्यमातून वृक्ष छाटणी आणि फांद्या हटवण्याचे काम सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणी आणि फांद्या हटवण्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment