Cyclone Tauktae : मच्छिमारांनी पुढील 3 दिवस समुद्रात जाऊ नये; हवामान विभागाच्या सूचना

Share Now To Friends!!

मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाशी दोन हात केल्यावर आता तोक्ते वादळाचा (Cyclone Tauktae) सामना करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरु झाली आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचीही शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवस मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून तोक्ते हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहुन पाकिस्तानच्या दिशेनं पुढे जाणार आहे. तत्पूर्वी त्याचा फटका महाराष्ट्राच्या किनारी भागाला जाणवणार आहे. यामध्ये मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवस मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार जवळपास समुद्रात गेलेले 300 मच्छिमार आता पुन्हा समुद्रकिनारी आले आहेत.

Cyclone : अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका; जाणून घ्या कशी ठरवली जातात वादळांची नावं

अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (14 मे) ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासोबतच आपत्तीव्यवस्थापन विभाग देखील सज्ज झालं आहे. राज्यातील मच्छिमारांना तोक्ते चक्रीवादळाचा 15,16 आणि 17 तारखेला फटका बसणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच जोरदार पाऊस देखील पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासाठी मत्स्य विभागाने व्हाट्सअॅपचे विविध ग्रुप तयार केले असून मच्छिमारांना त्यामाध्यमातून वेळोवेळी सूचित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यावर या चक्रीवादळाचा प्रभाव 15 16 आणि 17 मे रोजी जाणवणार असल्याचं हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्र किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून 16 आणि 17 मे रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. या काळात समुद्र खवळलेला राहणार असून ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. या काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना शुभांगी भुते यांनी दिल्या आहेत.

भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून वादळासंदर्भात पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार 15 मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गोवा कोकण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जाणून घ्या कशी ठरवली जातात वादळांची नावं

तोक्ते वादळाबाबत बोलताना बधवार पार्क परिसरातील स्थानिक मच्छिमार जयेश म्हणाले की, मागील 3 दिवसांपासून समुद्रात आत गेलेले मच्छिमार पुन्हा समुद्र किनारी येत आहे. या वादळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासाठी आम्ही देखील आमच्या बांधवांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या राज्याच लॉकडाऊन आहे. आमची सरकारला विनंती आहे की, लॉकडाऊनमुळे आमचे हाल झाले आहेत. मागे जे चक्रीवादळ येऊन गेले त्यामध्ये आमच्या बोटींचं नुकसान झालं आहे. निदान आता तरी आमचा विचार सरकारने करावा आणि आम्हाला थोड्याफार प्रमाणात तरी आर्थिक मदत करावी. त्यामुळे आम्हाला थोडा तरी दिलासा मिळेल.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment