French Open 2021: जोकोविचने नदालला पराभूत करून रचला इतिहास; अंतिम सामन्यात त्सिटिपासशी होणार सामना

Share Now To Friends!!

French Open 2021: जगातील नंबर एकचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नोवाक जोकोविचने लाल मातीतील किंग राफेल नदालचं 14 वे फ्रेंच ओपन रेकॉर्ड जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. दुसर्‍या उपांत्य सामन्यात जोकोविचने चार सेटच्या सामन्यात नदालचा 3-6, 6-3, 7-6, 6-2 असा पराभव केला. जोकोविचला आता मागच्या 50 वर्षात चारही ग्रँड स्लॅम दोनपेक्षा जास्त वेळा जिंकणारा पहिला खेळाडू होण्याची संधी आहे.

फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचने लाल मातीच्या मैदानाचा बादशाह राफेल नदालचा पराभव करण्याची ही पहिली वेळ नाही. 2015 मध्येही नदालला फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचकडून पराभवाला सामोरे जावे लागले. सन 2016 मध्ये जोकोविच फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळविण्यात यशस्वी झाला.

जगातील सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक असलेला राफेल नदाल याअगोदर नंबर वन खेळाडू रॉजर फेडररचा विक्रम मोडण्याच्या उद्देशाने मैदानात आला होता. फेडरर आणि नदाल या दोघांनी आतापर्यंत 20-20 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. फेडररला हरवण्यासाठी आता नदालला पुढच्या फ्रेंच ओपनची वाट पाहावी लागेल.

अंतिम सामन्यात स्टेफानोस त्सिटिपास सोबत सामना होणार
नदालने जोकोविचविरुद्ध उपांत्य सामन्यात शानदार सुरुवात करत पहिला सेट 6-3 ने जिंकला होता. पण, जोकोविचने दुसर्‍या सेटमध्ये नदालला 6-3 ने पराभूत करून नेत्रदीपक पुनरागमन केले. तिसर्‍या सेटमध्ये जोकोविचने अत्यंत चुरशीच्या लढतीत 7-6 ने आघाडी मिळवली. तर चौथ्या सेटमध्ये जोकोविचने 6-2 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

चार तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या या सामन्यानंतर जोकोविच म्हणाला की नदालविरुद्ध जिंकणे आश्चर्यकारक आहे. फ्रेंच ओपनमधील माझ्यासाठी हा सर्वात अविस्मरणीय सामना आहे. फ्रेंच ओपन जिंकून आपल्या कारकीर्दीचा 19 वा ग्रँड स्लॅम जिंकण्याची आता जोकोविचकडे मोठी संधी आहे. इतकेच नाही तर जोकोविचने फ्रेंच ओपन जिंकल्यास तो नदाल आणि फेडररपेक्षा फक्त एक पाऊल मागे असेल.

अंतिम सामन्यात जोकोविचचा सामना 22 वर्षीय स्टेफानोस त्सिटिपासशी होईल. त्सिटिपासच्या कारकीर्दीतील हे पहिले ग्रँड स्लॅम फायनल असेल. उपांत्य सामन्यात त्याने झेवरेव्हचा 6-3, 6-3, 4-6, 6-3 ने पराभव केला.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment