Pimpri Chinchwad : मृतदेहाची विटंबना करणारा ‘तो’ ठेकेदार राष्ट्रवादीशी संबंधित?

Share Now To Friends!!

पिंपरी चिंचवड : शहरात एका कोरोनाबाधित मृतदेहाची विटंबना झाल्याने खळबळ उडाली होती. अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके भटकी कुत्री तोडत असल्याचा व्हिडीओच समोर आला. यानंतर महापौर माई ढोरे यांनी स्वतः निगडी स्मशानभूमीत जाऊन पाहणी केली. संबंधित ठेकेदाराचा हा गलथान कारभार असल्याचा आरोप आहे. अशातच हा ठेकेदार राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचं बोललं जातंय. 

संबंधित ठेकेदाराचं नाव बाळासाहेब वाघेरे असं असून शुभम उद्योग असं त्याच्या फर्मचं नाव आहे. 1 मे ला पालकमंत्री अजित पवार स्वतः शहरात आले होते. तेव्हा कोरोनाच्या अनुषंगाने चाललेल्या गैरकारभाराविरुद्ध अजित पवारांनी भाष्य केलं. या कठीण काळात ‘मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अवलादी’ देखील पहायला मिळाल्या, अशा तीव्र शब्दात पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. तेंव्हा शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ हेही त्या ठिकाणी उपस्थित होते. 

अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं  शहरात किमान राष्ट्रवादीकडून असे गैरप्रकार घडणार नाहीत, याची जबाबदारी स्थानिक नेत्यांनी घ्यायला हवी होती. पण ठेकेदार बाळासाहेब वाघेरे यांच्याकडून असं कृत्य घडलंय, जे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचं बोललं जातंय. त्यांच्या शुभम उद्योग या कंपनीकडे कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आहे. प्रत्येक अंत्यसंस्कारामागे पैसेही मोजले जातात. पण त्यानंतरही मृतदेह अर्धवट अवस्थेत सोडले जात असतील, भटके कुत्रे त्या मृतदेहाचे लचके तोडत असतील तर मग ही जबाबदारी कोणाची? 

ठेकेदार बाळासाहेब वाघेरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने त्यांच्याशी संपर्क केला. तेंव्हा त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. पालिकेने दिलेल्या नोटिशीला आम्हाला उत्तर देऊ, असं म्हणून अधिकचं बोलणं टाळलं.

या प्रकरणी पालिकेने हात वर केलेले आहे. केवळ नोटीस धाडली यावरच पालिका प्रशासन थांबलय. दुसरीकडे ‘मयताच्या टाळूवरचं लोणी’ खाणाऱ्यांबाबत वक्तव्य करणारे अजित पवार तरी कारवाईचे आदेश देतात का? की पुन्हा त्यांनाच रेड कार्पेट टाकतात हे पहावं लागेल.

महापौरांचा स्मशानभूमीत पाहणी दौरा आणि आरोप

निगडीच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये  अनेक त्रुटी आणि हलगर्जीपणा निदर्शनास आला असा आरोप करत महापौर माई ढोरे यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली आणि प्रशासनास कारवाईचे आदेश ही दिलेत. अमरधाम स्मशानभूमीबाबत काही तक्रारी येत होत्या. अर्धवट अवस्थेत जळालेले मृतदेह राहत असल्याने, मृतदेहाची विटंबना होते. म्हणून इथं दिले जाणारे सरपण साहित्य कसे आहे, याची पाहणी महापौरांनी केली. महानगरपालिका कोविड बाधित मयतांच्या अंत्यसंस्कारासाठी 8 हजार रुपये इतका खर्च देत आहे, तरी निकृष्ठ प्रतीचे लाकूड, तसेच कमी लाकडाचा वापर केल्याने मृतदेहाचे व्यवस्थित दहन होत नाही. असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे घडल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले. सुरक्षा आणि आरोग्य कर्मचा-यांनी मयतावर अंत्यसंस्कार होत असताना ते पूर्ण होईपर्यंत जबाबदारीने काम केले पाहिजे असं महापौर म्हणाल्या. 

महत्वाच्या बातम्या : 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment